Menu

मारी गेरपर्ट-मेयर

(Maria Goeppert Mayer)

जन्म: २८ जून १९०६.
कार्यक्षेत्र: भौतिकीशास्त्र.

मारी गेरपर्ट-मेयर
Maria Goeppert Mayer
जर्मन-अमेरिकन भौतिकीशास्त्रज्ञ
जन्म: 28 जून 1906
मृत्यू:

प्रतिभावंत स्त्री भौतिकीशास्त्रज्ञ

वैज्ञानिक म्हटले की साधरणत आपल्या नजरेसमोर पुरूष वैज्ञानिकांचीच नावे येतात. जणू काही विज्ञान संशोधन ही पुरूषांची मक्तेदारी आहे. पण विज्ञानाच्या इतिहासात, विशेषत: विसाव्या शतकात, अनेक स्त्री-वैज्ञानिकांनी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यापैकीच एक आहे मारी गेरपर्ट-मेयर.
मारी गेरपर्ट यांनी 1930 मध्ये जर्मनीतील गर्टिगेन विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली आणि नंतर अमेरिकेत स्थलांतर करून 1933 साली अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. त्यांनी जोसेफ मेयर या भौतिकी-रसायन शास्त्रज्ञाशी विवाह केला. व आपल्या मूळच्या गेरपर्ट आडनावाला मेयर आडनावाची जोड देऊन ‘गेरपर्ट-मेयर’ असे नवीन आडनाव धारण केले.
मारी यांनी 1948 मध्ये शिकागो विद्यापीठात शिकविण्यास आणि अणूविषयीच्या संशोधनाला सुरुवात केली. तोपर्यंत अणूच्या रचनेच्या अभ्यासातून सिध्द झाले होते की, अणूच्या अंतर्भागात एक केंद्रक किंवा अणूकेंद्र असते आणि अणूच्या बाह्य भागात अथवा बाह्य कवचात इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्यांची विशिष्ट संरचना असते. 1943 मध्ये मारी यांनी आपले लक्ष अणूकेंद्राच्या (Nuclrus) अभ्यासावर एकाग्र केले. त्या वेळी अणू केंद्रात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे कण असतात हे ज्ञात होते. परंतु, केंद्राची आंतर्रचना नेमकी कशी असते, हे माहीत नव्हते. मारी यांनी स्वत: केलेल्या अभ्यासातून संकल्पना मांडली की, अणूकेंद्राची संरचनादेखील अणूच्या बाह्य कवचाच्या रचनेशी मिळतीजुळती असते. अणूच्या बाह्य कवचात जशी इलेक्ट्रॉनची विशिष्ट पध्दतीची संरचना असते तशीच अणुकेंद्राच्या कवचात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन विशिष्ट पध्दतीची संरचना असते. (हे कण केंद्रकात म्हणजे न्युक्लिअसमध्ये असल्याने त्यांना न्युक्लिऑन म्हणतात.) मारी यांच्या या संकल्पनेला अणूकेंद्राचे ‘कवच प्रारूप’ (Shell Model) असे संबोधले जाऊ लागले.
पुढील अभ्यासातून अणूकेंद्रातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येचा अभ्यास होऊन लक्षात आले की, अणूचे स्थैर्य (Stability) जसे त्याच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते तसे अणूकेंद्राचे स्थैर्यदेखील त्यातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच्या संख्येवर अवलंबून असते. या माहितीच्या आधारेच काही अणूकेंद्रे इतर काही अणूकेंद्रापेक्षा जास्त स्थिर का असतात, हे समजू शकले. मारी यांचे हे संशोधन चालू असतानाच जेनसेन नावाच्या जर्मन शस्त्रज्ञाने स्वतंत्रपणे संशोधन करून तसेच निष्कर्ष काढले. पुढे मारी आणि जेनसेन दोघांनी मिळून या विषयावर पुस्तक प्रसिध्द केले. मारी गेरपर्ट, जेनसेन आणि विनगर यांना त्या 1963 सालचे भौतिकीतील नोबेल पारितोषिक देण्यात आले.