जन्म: २२ सप्टेंबर १७९१.
मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७.
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञान शास्त्र.
मायकेल फॅराडे
Michael Faraday
इंग्लिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ
जन्म: 22 सप्टेंबर, 1791
मृत्यू: 25 ऑगस्ट, 1867
चिकित्सक व मानवतावादी शास्त्रज्ञ
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचा काळ. इंग्लंडमध्ये माध्यमिक शिक्षण सार्वत्रिक झाले नव्हते. पण शिक्षणाचा प्रसार वाढत होता. विशेष म्हणजे वाचनाची गोडी व अभ्यासाची संस्कृती कामगारवर्गात पसरली होती. मायकेल फॅराडेसारख्या जेमतेम प्राथमिक शिक्षण घेतलेला लोहाराचा मुलगा, तेराव्या वर्षी एका दुकानात नोकरीला लागला. बुक बाईंडिंगच्या दुकानात काम करताना पुस्तके हातात आली. रसायनशास्त्राची पाठ्यपुस्तके, विश्वकोषातील विजेसंबंधीचे लेख त्याने आवडीने वाचले. त्यामुळे विज्ञानाची गोडी निर्माण झाली. त्याने डेव्ही यांच्या व्याख्यानांना जाऊन व्यवस्थित टाचणे बनवून ती डेव्हींकडे पाठविली आणि त्यांच्या प्रयोगशाळेत मदतनीसाची नोकरी मिळविली. तेथे तो रसायनशास्त्र, धातुशास्त्र आणि वीज यावरील प्रयोगांत गुंतला. स्वतंत्र प्रतिभा, चिकित्सक बुध्दी, सखोल वाचन, अभ्यास आणि दीर्घ परिश्रमपूर्वक प्रायोगिकता यांच्या मिलाफातून तो जगतमान्य संशोधक म्हणून नावाजला. त्या काळात पदवीचे स्तोम नसल्याने अर्धशिक्षित फॅराडे 1825 साली डेव्ही यांच्या प्रयोगशाळेचा संचालक बनले, तर 1833 मध्ये लंडनमधील प्रख्यात रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले.
1833 साली फॅराडे यांनी वायूवरील दाब वाढवून त्याचे द्रवीकरण करण्याची पध्दती शोधून काढली. रसायनशास्त्रातील हा त्यांचा महत्वाचा शोध. 1832 साली त्यांनी विजेच्या प्रवाहाच्या साहाय्याने रासायनिक पृथ:करण करण्यासंबंधीचे नेमके नियम मांडले. आज ते ‘फॅराडेचे नियम’ म्हणून ओळखले जातात. फॅराडे यांच्या संशोधनामुळे रासायनिक पृथ:करण आणि वीज यांच्यामधील संबंध स्पष्ट झाला. वीज ही कणांची बनलेली असते, या कल्पनेला फॅराडे यांच्या शोधामुळे पुष्टी मिळाली.
फॅराडे यांचे मुख्य कार्य वीज आणि लोहचुंबकीय आकर्षण यांच्या परस्परसंबंधाविषयी आहे. विजेच्या प्रवाहामुळे लोहचुंबकीय परिणाम दिसून येतात, हे ऑम्पेर आणि वेस्टेड यांनी दाखवून दिले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन फॅराडे यांनी चुंबकीय आकर्षणापासून तयार करता येईल का, असा शोध घेण्यास सुरुवात केली. विजेचा प्रवाह वापरून गती निर्माण करण्यात त्यांनी यश मिळविले. त्यामुळे विद्युत मोटार बनविण्यासाठी उपयुक्त असे मूलभूत तत्व त्यांच्या लक्षात आले. तांब्याची चकती चुंबकीय ध्रुवांमध्ये वेगाने फिरवून सततचा वीजप्रवाह निर्माण करण्यातही त्यांनी यश मिळवले. हा पहिला डायनॅमो होता. फॅराडे यांच्या शोधामुळे वीजनिर्मिती आणि विजेचा यांत्रिक वापर या गोष्टी शक्य झाल्या. पण फॅराडे यांनी स्वत: आपल्या शोधाचा धंदेवाईक उपयोग करण्याकडे लक्ष दिले नाही. धंद्यातील अनिश्चितता आणि उचापती त्यांना मानवणाऱ्या नव्हत्या.
विद्युतप्रवाहाचे चुंबकीय परिणाम शोधल्यावर हे परिणाम का घडतात, याबद्दलच्या सैध्दांतिक विवेचनाकडे फॅराडे वळाले. त्यांचे गणितावरील प्रभुत्व मर्यादित असल्याने त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून प्रश्नाला हात घातला. प्रेरणाक्षेत्राची संकल्पना त्यांनी मांडली. प्रेरणारेषा सर्वदूर पसरलेल्या असतात आणि त्यामुळे एकमेकांपासून दूर असलेल्या वस्तू एकमेकांवर परिणाम करू शकतात, असे त्यांनी प्रतिपादले. फॅराडे यांच्या मांडणीत आधुनिक ‘क्षेत्र सिध्दांताची’ (फिल्ड थिअरी) बीजे होती.
लोकांपर्यंत विज्ञान पोहचावे यादृष्टीने 1826 साली फॅराडे यांनी रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये ‘शुक्रवार संध्याकाळ’ची व्याख्याने सुरू केली. ही परंपरा अजूनही चालू आहे. तरूणांसाठी ख्रिसमस व्याख्यानमालाही सुरू केली. व्याख्यानामध्ये करून दाखवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग मुद्दाम सुरू केले. फॅराडे सामाजिकदृष्ट्या जबाबदार व मानवतावादी शास्त्रज्ञ होते. क्रिमियन युध्दाच्या वेळी ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर विषारी वायू बनवता येण्याच्या शक्यतेविषयी चौकशी केली. फॅराडे यांनी सरकारला कळविले की, जरी असा विषारी वायू बनवता येणे शक्य असले तरी विषारी वायू बनवण्यासाठी ते सरकारला कुठलेही सहकार्य करणार नाहीत.