जन्म: १४ फेब्रुवारी १४७३.
मृत्यू: २४ मे १५४३.
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.
निकोलस कोपर्निकस
Nicolaus Copernicus
पोलिश खगोलशास्त्रज्ञ
जन्म : 14 फेब्रुवारी, 1473
मृत्यू : 24 मे, 1543
पारंपरिक चौकटी मोडणारा खगोलशास्त्रज्ञ
विज्ञान कोणतेच सत्य अंतिम मानत नाही. विज्ञानाचा इतिहास हा प्रस्थापित ज्ञान कल्पना याबद्दल शंका निर्माण झाल्यानेच झालेला आहे. अर्थात या शंकांना कोठेतरी आधार असलेला दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोपर्निकसचा सूर्यकेंद्री सिध्दांत.
कोपर्निकसचा सूर्यकेंद्री सिध्दांत : 1543 साली कोपर्निकस यांनी आपला ‘द रेव्होल्यूशनिबस ऑर्बियम सोलेश्चियम’ हा आकाशस्थ ग्रहांच्या भ्रमणाविषयीचा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि त्या काळापर्यंत युरोपात शिरसावंद्य मानल्या जाणाऱ्या ग्रीक खगोलशास्त्रीय सिध्दांताला जबर धक्का बसला. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये अलेक्झांड्रियातील खगोलशास्त्रज्ञ टोलेमी यांनी मांडलेला सिध्दांत तोपर्यंत युरोपात सर्वमान्य होता. या सिध्दांतानुसार, पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य, चंद्र व ग्रह पृथ्वीभोवती फिरतात, असे मानले जाई. या सिध्दांताच्या आधारे वर्षांची अचूक कालगणना करता येत नव्हती. सूर्य, चंद्र व ग्रह यांच्या गती ठरविताना कार्यकारणभावाचे एकच नियम सर्व ठिकाणी लागू केले जात नव्हते. अशा त्रुटी लक्षात घेता विश्वरचनेविषयी वेगळा सिध्दांत कोणी मांडला आहे का, याचा शोध घेण्यास कोपर्निकस यांनी सुरुवात केली. अनेक प्राचीन ग्रंथ त्यांनी पालथे घातले. अरिस्टारकस या ग्रीक तत्त्ववेत्याने सूर्याभोवती पृथ्वी फिरते, असा सिध्दांत मांडलेला होता. सूर्य व ग्रह दररोज पृथ्वीभोवती भ्रमण करतात, असे गृहीत धरण्याऐवजी सूर्याभोवती पृथ्वी फिरते, असे मानल्यास खगोलशास्त्रातील अनेक गुंतागुंती आणि विसंगती टाळता येण्याजोग्या होत्या. म्हणून सूर्यकेंद्रित ग्रहमालेचा सिध्दांत कोपर्निकस यांना आकर्षक वाटला व तो सिध्दांत त्यांनी तपशीलवार गणिती आकडेमोडीद्वारे तपासायला घेतला. या सिध्दांतातील मुख्य गृहिते पुढीलप्रमाणे होती – सूर्य हा सर्व ग्रहांच्या मध्यभागी असून बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी सूर्याभोवती फिरतात. पृथ्वी 24 तासांत आपल्या अक्षाभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती 27.33 दिवसांत फिरतो. पृथ्वी व ग्रह यांच्या भ्रमणकक्षा वर्तुळाकार आहेत. या ग्रहांखेरीज इतर सर्व तेजोपुंज स्थिर असून ते पृथ्वीपासून अतिदूर अंतरावर आहेत. आपला सिध्दांत कोपर्निकस मोठ्या आलंकारिक भाषेत मांडतो, ‘सूर्य जणू आपल्या शाही सिंहासनावर बसून त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांवर, आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवून असतो. पृथ्वीच्या दिमतीला चंद्र हजर असतो…’
कोपर्निकस यांच्या सिध्दांतामुळे विश्वाचे नियमन समजून घेण्यासाठी अदृश्य शक्ती किंवा देवाची जरूर उरली नाही. नैसर्गिक स्वभावधर्मातच विश्वाचे गतीनियम कोपर्निकस यांनी शोधले. ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार आहेत, असे कोपर्निकस यांनी गृहीत धरले, कारण त्या काळात वर्तुळ हा आकार परिपूर्ण मानला जाई. वास्तविक वर्तुळाकाराचा आग्रह धरल्यास उपकक्षांचा त्यांना आश्रय घ्यावा लागला व गुंतागुंत विनाकारण वाढली. पृथ्वी स्वत:भोवती कशी फिरते याचे उत्तर त्यांनी ‘ती गोलाकार असल्याने पृथ्वीला स्वयंगती मिळते’ असे दिले. पृथ्वी स्वत:भोवती फिरते तेव्हा तिचे भाग इतस्तत: का फेकले जात नाहीत याचे उत्तर त्यांनी ‘भ्रमण ही पृथ्वीची नैसर्गिक गती असल्याने त्यातून तिचा नाश उद्भवणे शक्य नाही,’ असे दिले. कोपर्निकस यांच्या काळातील पदार्थविज्ञानाची प्रगती लक्षात घेता वरील प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देणे कठीण होते. विज्ञानाच्या आजच्या प्रगतीने कोपर्निकस यांची उत्तरे चूक होती, हे आपल्या लक्षात येते.
कोपर्निकस यांच्या मांडणीत अशा काही त्रुटी अपरिहार्यपणे होत्या. परंतु, त्या काळात सर्वमान्य असणाऱ्या व अनुभूतीतून पटणाऱ्या सिध्दांताची चौकट मोडून त्याच्या उलट सिध्दांत त्यांनी मांडला व परिश्रमपूर्वक गणिती आकडेमोड आणि निरीक्षणांशी पडताळा यांच्या आधारे तो सिद्ध केला. त्यामुळे खगोलशास्त्रात तर क्रांतिकारक बदल झालेच पण धार्मिक क्षेत्रातही वादंग मांजले. कारण पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून तिच्यावरचा मानव हा सर्वश्रेष्ठ आहे आणि ईश्वरी संकेतानुसार मानवाचे नियमन करणारे पोप आणि चर्च यांची अधिसत्ता अबाधित असली पाहिजे, या संकल्पनेचा पायाच हादरला. हे नवे पाखंडी विचार लोकांपर्यंत पोचले, लोक बायबलबाबत प्रश्न विचारू लागले तर चर्चला ते धोकादायक होते. म्हणून चर्चच्या दंडाधिकाऱ्यांनी 1616 साली कोपर्निकस यांच्या पुस्तकावर बंदी घातली. अर्थात कोपर्निकस यांचा सिध्दांत व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त असल्याने त्याचा प्रसार होऊ लागला. कालगणना, ग्रहांची गती यांची गणती करणे, त्याच्या सिध्दांतामुळे सोपे झाले व समुद्र पर्यटन, वार्षिक कॅलेंडर यासाठी त्याचा वापर सुरू झाला.
कोपर्निकस यांचा जन्म 14 फेब्रुवारी, 1473 साली पोलंडमध्ये विस्चुला नदीच्या काठी तरुन या गावी झाला. त्यांचे शिक्षण प्रथम पोलंडमधील विद्येचे माहेरघर कॉकॉ विद्यापीठात व पुढे इटलीत झाले. खगोलशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्र, धार्मिक कायदा याचे शिक्षण पुरे करून वयाच्या 40 व्या वर्षी कोपर्निकस फ्रॉमबोर्क येथे धार्मिक अधिकारीपदावर रुजू झाले. कोपर्निकस बहुश्रूत व अष्टपैलू होते. प्रशासकीय जबाबदारी, वैद्यकीय सेवा इत्यादी व्यवसाय सांभाळून ते प्रचलित आर्थिक-राजकीय प्रश्नात लक्ष घालीत, लिखाण, काव्य करीत आणि त्याबरोबरच अनेक वर्षे त्यांनी आपल्या सिध्दांताची सिध्दता करण्यासाठी निरीक्षणे व गणिती आकडेमोड चालू ठेवली होती.
कोपर्निकस यांचे दुसरे वैशिष्टय म्हणजे त्यांनी शास्त्रीय पद्धती पुढे आणली. एखाद्या नवीन कल्पनेचे संभाव्य सिध्दांतात रुपांतर करून काटेकोर गणिती तर्काने तो सिद्ध करणे व निरीक्षण अथवा प्रयोगांद्वारे तो पडताळून पाहणे, ही शास्त्रीय संशोधन पद्धती त्यांनी वापरली. त्यांनी निरीक्षणे मोजकीच केली होती, पण ती विशिष्ट सैद्धांतिक चौकटीत असल्याने त्यांचा चपखल उपयोग झाला. आज माहिती, निरीक्षण व संकलन यांचा महापूर लोटत असतो, पण त्या संकलनाला निश्चित दिशा व सैद्धांतिक बैठक अनेकदा नसल्याने भारंभार काम करूनही त्यातून काही निष्पत्ती होत नाही. कोपर्निकस आदी शास्त्रज्ञांनी वापरलेली शास्त्रीय पद्धती आत्मसात करणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.
कोपर्निकस, लिओनार्दो दा व्हिंची असे अनेक अष्टपैलू शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते व कलाकार आपणास सोळाव्या शतकात युरोपात पुढे आलेले दिसतात. त्या काळात जमीनदार-सरंजामदारांचे वर्चस्व कमी होऊन शहरी व्यापार वर्ग पुढे आला होता. व्यापाराच्या वाढीबरोबरच जागतिक दळणवळण वाढत होते. विचारांची देवाणघेवाणही वाढत होती. सागरी पर्यटनामुळे भारत, चीन आदी प्राचीन संस्कृतींतील ग्रंथ अरबांद्वारा युरोपात पोचले होते. छपाईचा शोध लागून नव्या विचारांचा प्रसार पुस्तकांद्वारे करणे सुकर झाले होते. या मंथनामध्ये बायबल आणि चर्चला आव्हान देऊन पाखंडी विचार मांडणारे अनेक शास्त्रज्ञ युरोपात पुढे येऊन विज्ञानयुगास प्रारंभ झाला.