Menu

निकोलाय इवानोविच वावीलोव

(Nikolai Ivanovich Vavilov)

जन्म: २८ नोव्हेंबर १८८७.
मृत्यू: २६ जनेवारी १९४३.
कार्यक्षेत्र: अनुवंशशास्त्र.

निकोलाय इवानोविच वावीलोव
Nikolai Ivanovich Vavilov
सोविएत अनुवंशशास्त्रज्ञ
जन्म: 28 नोव्हेंबर, 1887
मृत्यू: 26 जानेवारी, 1943

मोलाचे योगदान

“विज्ञानाचे एक पाऊल पुढे पाडण्यासाठी मी माझा प्राण द्यायला केव्हाही तयार आहे”, 1931 साली दुष्काळ निर्मूलनावर भरलेल्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या वावीलोव यांचे हे उद्गार होते. अनुवंशशास्त्रातील तत्कालीन वादात विज्ञानाची बाजू ठामपणे घेऊन उभे राहिल्याने 1943 मध्ये वावीलोव यांना खरेच आपले प्राण गमवावे लागले. सोविएत युनियनमध्ये तो काळच बिकट होता. 1929 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेला आरंभ झाला. औद्योगिकरण झपाट्याने सुरू झाले, पण शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेना म्हणून शेतीच्या सामुहिकीकरणाची मोहीम हाती घेतली, यामध्ये शेतकऱ्यांना सामील करून घेऊन उत्पादन वाढविण्यासाठी शास्त्रज्ञांकडून नवी तंत्रे, नवे शोध पुढे यावे अशी सरकारची अपेक्षा होती. या काळात लायसेंकोसारखे तंत्रज्ञ नवनवी तंत्रे घेऊन पुढे आले, ती तंत्रे विवाद्य असली तरी शेतकऱ्यांना शेतीच्या कामात गुंतवायला ती उपयोगी पडली. लायसेंकोंचा भर होता परिस्थिती नियंत्रित करण्यावर. त्यांचा दावा होता की, बियाणे गार पाण्यात भिजवून ठेवून त्याचे तापमान उतरवून गव्हाच्या वाढीचा काळ कमी करता येतो. सोविएत युनियनमधील बऱ्याच भागात शेते 7-8 महिने बर्फाच्छादितच असतात, त्यामुळे वाढीचा एकूण काळ थोडा कमी केला तरी त्यास कळीचे महत्व येते. शेतकऱ्यांना गहू भिजवणे, कापसाची पानतोड करणे अशा “नव्या समाजवादी“ कामात गुंतवून त्यांचा असहकार मोडण्यात मदत झाली.
त्या काळात वावीलोवसारखे अनुवंशशास्त्रज्ञ मूलभूत संशोधनात गुंतलेले होते. सो. युनियनमध्ये पिकांच्या वाढीचा काल कमी असल्याने थोडक्या काळातही अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीची पैदास करण्याचे आव्हान अनुवंशशास्त्रज्ञांपुढे होते. कृत्रिम पैदाशीचे तंत्र अनेक शतके अवगत असले तरी त्यांचे अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण झालेले नव्हते. असे विश्लेषण करून त्या आधारे इच्छित घटक नियंत्रित करून नवीन वाण पैदास करण्यासाठी संशोधन व माहितीचे संकलन वावीलोव यांच्या मार्गदर्शनाखाली पध्दतशीरपणे चालू होते. 1916 ते 1933 च्या दरम्यान जगातल्या साठ देशात मोहिमा काढून सुमारे तीन लाख वनस्पतींचे प्रचंड भांडार त्यांनी गोळा केले. पैदासित वनस्पतींच्या मूलस्थानाचा शोध घेतला. देशभर 400 नव्या संशोधन केंद्रांची स्थापना करून तेथे विश्लेषणाचे व संकलनाचे काम सुरू केले. पण भरघोस उत्पादन देणाऱ्या संकरित जातींची पैदास 1940 नंतर शक्य झाली. त्यामुळे तिशीच्या दशकात लायसेंकोसारख्या तंत्रज्ञांनी अनुवंशशास्त्रावर टीकेची झोड उठवली आणि 1940 मध्ये सोविएत सरकारने अनुवंशशास्त्रातील संशोधनाचा पाठिंबा काढून घेतला. “भांडवली शास्त्रज्ञ“ म्हणून वावीलोव यांची रवानगी मजूर छावणीत झाली. 26 जानेवारी 1943 ला सैबेरियात मागादान येथ त्यांना मृत्यू आला.
वावीलोव यांची अनुवंशशास्त्रातील महत्वाची कामगिरी म्हणजे वनस्पतींच्या रोगप्रतिकारशक्तीबाबतचे त्यांचे संशोधन. वावीलोव यांचा दावा होता की, वनस्पती व कीड यामध्ये वर्षानुवर्षांच्या उत्क्रांतीतून विशिष्ट प्रकारचे नाते निर्माण होते. ज्या प्रदेशात विशिष्ट जाती उदभवल्या तेथे ही उत्क्रांतीची प्रक्रिया प्रदीर्घ काळ चाललेली असते आणि या काळात त्या वनस्पतीने रोगापासून प्रतिकारशक्ती मिळवलेली असते. परंतु अधिक उत्पादकतेच्या दृष्टीने पैदास केलेल्या जातीत ही प्रतिकारशक्ती आढळत नाही. अशा पैदास केलेल्या जातींचा, मूळ ज्या प्रदेशातून ज्या जाती आणल्या त्या वन्य जातींबरोबर संकट करून त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढवता येईल. या दृष्टीने निरनिराळ्या सुधारित जाती मूळ कोठून आणल्या, त्यांची केंद्रे शोधून काढणे व तेथील वन्य जाती गोळा करणे यास महत्व येते. वावीलोव यांच्या या मूलभूत संशोधनामुळे बटाटे, तंबाखू, गहू, आदी अनेक पिकांच्या रोग प्रतिकारशक्ती वाढवलेल्या जातींची पैदास करण्यास मदत झाली.
अनुवंशशास्त्रातील मूलभूत संशोधन व वनस्पती आणि बियाणे यांचे प्रचंड भांडार गोळा करून हजारो नवीन वाणांची पैदास करण्यास वावीलोव यांच्या पुढाकाराने उभारलेल्या संशोधन संस्था व त्यात तयार झालेले शास्त्रज्ञ यांचे मोठे योगदान आहे. 1940 ते 1955 च्या काळात सरकारी धोरणामुळे हे संशोधन मागे पडले तरी 1917 पासून या कामाचा जो पाया वावीलोव यांनी घातला त्याचा लाभ सोविएत युनियनला पुढील काळात मिळाला.