Menu

ओले हानसेन

(Ole Hansen)

जन्म: ०१ जून २०१८.
मृत्यू: २३ मे १९८५.
कार्यक्षेत्र: वैद्यकशास्त्र.

ओले हानसेन
Ole Hansen
स्वीडिश लोकवैज्ञानिक डॉक्टर
जन्म: 1936
मृत्यू: 23 मे, 1985

लोकहितवादी डॉक्टर

डॉ. ओले हानसेन हे स्वीडनमधील एक डॉक्टर. लहान मुलांच्या मज्जासंस्थेला होणाऱ्या आजारांचे तज्ज्ञ. स्वीडनमधील सीबा-गायगी या प्रसिद्ध बहुदेशीय औषध कंपनीच्या न्याय-नीतिरहित कारभारामुळे पंगुत्व आलेल्या रूग्णांच्या लढ्यात ते एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओढले गेले. या लढ्यात व नंतर त्यांनी या बलाढ्य कंपनीविरूध्द चिकाटीने जी यशस्वी लढत दिली त्यामुळे आरोग्य चळवळीत ते एक आदर्श प्रेरणास्थान बनले. डॉ. हानसेन यांच्या या स्फूर्तिदायी लढ्याची कथा थोडक्यात अशी आहे-
एन्टेरोव्हायोफॉर्म, मेक्झॅफॉर्म इत्यादी टोपणनावांनी मिळणाऱ्या गोळ्यांमध्ये ‘क्लिनोलोन’ या गटाचे औषध असते. ‘सीबा-गायगी’निर्मित या औषधाच्या सेवनाने जपानमध्ये 1960-70 या काळात हजारो नागरिक स्मॉन (SMON) नावाच्या आजाराने पंगू झाले, त्यातील अनेक आंधळेही झाले. मज्जासंस्थेच्या या आजारात पायाला मुंग्या येणे, सुया टोचल्यासारखे वाटणे व बोटांपासून वरपर्यंत ताकद जाणे, दृष्टी मंद होत शेवटी अंधत्व येणे असा जीवघेणा त्रास होतो. जपानमध्ये 11 हजार सात नागरिक स्मॉन-ग्रस्त म्हणून अधिककृतरित्या नोंदले गेले. याशिवाय आणखी 10 ते 20 हजार नागरिक स्मॉन-ग्रस्त असावेत असा अंदाज होता. या स्मॉनग्रस्तांनी ‘सीबा-गायगी’विरूद्ध कोर्टात दावा लावला. त्यात त्यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी ओले हानसेन यांना त्यांनी तज्ज्ञ म्हणून पाचारण केले. कारण क्विनोलोनमुळे स्मॉन होतो हे 1963 मध्येच हानसेन यांच्या लक्षात आले होते. (खरेतर, या दुष्परिणामांची कल्पना ‘सीबा-गायगी’ला 1939 मध्येच मांजरीवरील प्रयोगामधून आली होती.) हानसेन व इतर तज्ज्ञांनी दिलेल्या साक्षीमुळे ‘सीबा-गायगी’चा नाईलाज झाला व जपानमधील स्मॉन-ग्रस्तांची माफी मागून नुकसान भरपाई देणे ‘सीबा-गायगी’ला भाग पडले.
स्वीडनमध्ये मात्र काही स्मॉन-ग्रस्तांनाच नुकसान भरपाई द्यायची ‘सीबा-गायगी’ने तयारी दर्शविली. तसेच मेक्झॅफॉर्म, एंटेरोव्हायोफॉर्म हा घातक औषधांचे उत्पादन सर्व देशांमध्ये थांबवायला नकार दिला. त्यामुळे हानसेन व त्यांचे सहकारी यांनी ‘सीबा-गायगी’वर दबाव आणण्यासाठी एक अभूतपूर्व असे पाऊल उचलले. या डॉक्टरांनी ‘सीबा-गायगी’च्या औषधांवर बहिष्कार टाकला! रूग्णांना ‘सीबा-गायगी’ची औषधे लिहून द्यायचे बंद केले. त्यामुळे सव्वा कोटी पौड एवढी या औषधांची विक्री कमी झाली! एवढा फटका बसल्यावर मात्र या कंपनीने ऑक्टोबर 1982 मध्ये जाहीर केले की, ‘क्विनोलोन’ असलेली त्यांची औषधे जगभरच्या बाजारपेठेतून मागे घेण्यात येतील. सामाजिक हितासाठी डॉक्टर एवढ्या महाबलाढ्य कंपनीला नमवू शकतात, ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट हानसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शक्य करून दाखवली!
डॉ.ओले हानसेन यांच्या लक्षात आले की, एखादे औषध घातक किंवा निरूपयोगी आहे, तरी ते तसेच दडपून विकायचे हे ‘सीबा-गायगी’चे जणू धोरणच आहे! उदा. ब्यूटॅझोन या गटातील औषधांमुळे निरनिराळ्या प्रकारचे अत्यंत घातक दुष्परिणाम होऊ शकतात, हे ‘सीबा-गायगी’ला प्रथमपासूनच माहीत होते. एवढेच नव्हे, तर या दुष्परिणामांमुळे एकूण 1,036 जण मृत्यूमुखी पडल्याची नोंद त्यांच्या दप्तरी होती! पण ही माहिती कंपनीने दडपून ठेवली व हे औषध तसेच निरनिराळ्या किरकोळ वेदना व सूज यांच्यावर उपाय म्हणून बेदरकारपणे खपवले. ‘सीबा-गायगी’मधल्या आपल्या पाठीराख्यांच्या गुप्त मदतीने हानसेन यांनी हे सर्व प्रकरण बाहेर आणले. त्यामुळे या कंपनीवर खूप टीका होऊन, शेवटी त्यांना टॅडेरिल या नावाखाली विकल्या जाणाऱ्या ऑक्झिफेन-ब्यूटॅझोन या घातक औषधांची विक्री जगभर थांबावावी लागली. हानसेन यांनी ‘सीबा-गायगी’च्या इतर काही औषधांच्या विक्रीसंबंधीची कृष्णकृत्येदेखील उघडकीला आणली. एका व्यक्तीने एवढ्या मोठ्या औषध कंपनीविरूद्ध समाजहितासाठी सातत्याने, य़शस्वीपणे टक्कर घेण्याचे हे एकमेव उदाहरण असावे.
डॉ. हानसेन यांना कर्करोगाने अकाली घेरले. पण त्याने खचून न जाता ते अखेरपर्यंत स्मॉनग्रस्तांना पूर्ण न्याय देण्यासाठी व सीबा-गायगीचे धोरण बदलण्यासाठी झगडत राहिले. 23 मे, 1985 रोजी वयाच्या 49 व्या वर्षी या जिद्दी, लोकवादी डॉक्टरची प्राणज्योत मानवली. अलीकडच्या काळातील आरोग्य-चळवळीतील सर्वांत उत्तुंग अशा या तज्ज्ञ लढवय्याचा मृत्यूदिन (23मे) आरोग्य चळवळीत ‘ओले हानसेन दिन’ म्हणून पाळला जातो.