Menu

टायटस ल्युक्रिशिअस

(Titus Lucretius)

जन्म: इसविसनपूर्व ००९८.
मृत्यू: इसविसनपूर्व ००५५.
कार्यक्षेत्र: तत्वज्ञान.

टायटस ल्युक्रिशिअस
Titus Lucretius
रोमन तत्ववेत्ता व कवी
जन्म : इ.पूर्व 98
मृत्यू : इ.पूर्व 55

विश्वाचा प्रारंभ आणि त्यातील प्रक्रियांमागे कोणतीही र्इश्वरी वा अदभूत शक्ती नसून ती एक भौतिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे नियम माणसाला समजावून घेता येतात, हे दाखवून विज्ञाननिष्ठ भौतिकवादी तत्वज्ञानाला भक्कम पायावर उभे करायचे कार्य आधुनिक विज्ञानाने केलेले असले तरी या तत्वज्ञानाची मूळे प्राचीन ग्रकी, चीनी, भारतीय, रोमन संस्कृतीमध्येही दिसून येतात.
रोमन साम्राज्यात इसवीसन पूर्व काळातील ल्युक्रिशिअस् यांनी बुध्दि आणि सत्य प्रामाण्य वाद मांडला. तेव्हा त्यांची नास्तिक व चंगळवादी म्हणून निर्भत्सना करुन, त्यांना वेडा ठरवून त्यांचे विचार मारून टाकण्यात आले. इतिहासाच्या उदरात त्यांच्या ग्रंथाची जीर्ण अवस्थेतील एक प्रत 1417 साली इटलीमध्ये सापडली व त्यांचे विचार प्रकाशात आले.
ल्युक्रिशिअसने स्पष्टपणे मांडले की अंधश्रध्दा, रुढीग्रस्त समाज हेच सामाजिक कलह, -हासाचे मूळ कारण आहे. देवाचे भय, मृत्यूचे भय, मृत्यूनंतर नरकाचे भय आणि नैसर्गिक आपत्तीने भयग्रस्त समाज पंगू बनतो. स्वार्थांध, क्रूर, महत्वाकांक्षी बनतो. त्यातूनच कलह, युध्दे माजून प्रचंड संहार घडवतो. ल्युक्रिशिअसच्या काळात रोमन साम्राज्यात कौर्य आणि अत्याचाराचे थैमान चालू होते. श्रीमंतांची अरेरावी आणि गुलामांचे गुराहून भीषण जीणे या दुरावस्थेला ल्युक्रिशिअसच्या मते अंधश्रध्दा, देवभोळेपणा, व भयगंड पायाभूत आहे. तेव्हा त्या दूर करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी पद्य पंक्तीत गुंफलेल्या शास्त्रीय व तात्विक विचारशलाका ‘डेरेरम नेचुरा’ या सहा खंडीय ग्रंथातून प्रसूत केल्या.
ल्युक्रिशिअस यांनी ग्रीक तत्त्ववेत्ते एपिक्यूरस, डेमॉक्रीटस, अॅनास्कॅगोरस, हिपोक्रीटस, हेरॅक्लीस, प्लेटो आदींचा अभ्यास केला होता. होमरची महाकाव्ये व एपिक्यूरसचा भौतिकवाद याची त्यांच्यावर छाप होती. त्यांच्या ग्रंथामार्फत डेमॉक्रॅटिसचा आण्विक सिध्दांत, एपिक्यूरसचे भौतिक तत्वविचार युरोपात पोचले. आपल्या सहा खंडाची त्यांनी पध्दतशीरपणे आखणी व मांडणी केलेली आहे. पहिल्या दोन खंडामध्ये त्यांनी जग काही देवाने निर्माण केलेले नाही व देवाच्या लहरीनुसार चालत नाही याचे विवेचन केले. तर तिसऱ्या खंडात आण्विक सिध्दांताचा आधार घेऊन शरीरक्रिया व मनोव्यापार कसे चालतात याचे विवेचन केले व मृत्यू म्हणजे शरीर व मन दोहोंचीही अखेर असे दाखवून, आत्म्याचे अमरत्व, मृत्यूनंतर नरकवास, पूनर्जन्म इत्यादी भ्रामक कल्पना खोडून काढल्या. त्यांनी आनुवंशिकतेचे विवरणही केले. मुले आणि वडील / आजोबांमध्ये साम्य असते कारण पूर्वजांकडून गटागटात संयोगित झालेली बीजे शरिर सुप्त स्वरूपात जतन करते आणि ती एका पिढीकडून पुढल्या पिढीला दिली जातात अशी मांडणीही त्यांनी केली. चौथ्या खंडात एपिक्यूरसच्या प्रतिमा सिध्दांताचा आधार होऊन ल्युक्रिशिअसने एपिक्यूरसच्या इंद्रियगोचार प्रतिमांबाबतच्या सिध्दांताची चर्चा केलेली आहे. सर्व पदार्थांच्या प्रतिमा माणसाच्या ज्ञानेंद्रियांवर किंवा मनावर तत्काळ परिणाम घडवतात, हे परिणाम जागेपणी अथवा स्वप्नावस्थेतही होऊ शकतात, त्यातून आत्मा (spirit) मृत्यूनंतरही अस्तित्वात राहतो या समजुतीचे शास्त्रीय स्पष्टीकरण मिळू शकते असे प्रतिपादन केले. पाचव्या खंडात पृथ्वीची स्पष्टीकरण मिळू शकते असे प्रतिपादन केले. पाचव्या खंडात पृथ्वीची व्युत्पत्ती, आकाश, समुद्र, सूर्य – चंद्र – तारे यांची निर्मिती, जीवाची उत्पत्ती आणि माणसाची रानटी अवस्थेकडून विकसित संस्कृती मध्ये झालेली स्थित्यंतरे याची चर्चा करून हे विश्व र्इश्वरनिर्मित नाही हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. सहाव्या पुस्तकात माणसाला विलक्षण भय वाटणाऱ्या व कार्यकारण भाव अजिब उमगणाऱ्या आपत्ती – ज्वालामुखी, भूकंप, वादळे याची कारणमिमांसा दिली आहे. ज्या काळात विविध वस्तुंची, घटनांची कारणमिमांसा करताना देवाची इच्छा अशी अतींद्रिय कारणे देणे प्रचलित होते त्याकाळात ल्युक्रिशिअसने रोखठोक मांडणी केली होती की आपल्या डोळ्यांची बुबुळे हेतुपुर:सर निर्माण केली किंवा खांद्याला दोन्ही बाजूंनी मुद्दाम दोन हात बसवले की आपण जगण्यासाठी जरुर त्या सर्व क्रिया करु शकू असे काही घडले नाही, तर अवयवांनुरुप उपयोग आकार घेत गेला. जीभ नव्हती तेव्हा बोलता येत नव्हते. डोळे नव्हते तेव्हा दृष्टी नव्हती. अतींद्रिय कारणमिमांसा ही शास्त्रीय विचार पध्दती मान्यता पावेतो सरसहा वापरली जायची. ती नाकारून ल्युक्रिशिअसने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला.
त्याकाळातील ज्ञानाच्या मर्यादा, प्रयोगाचा अभाव या कारणाने निरीक्षण व तर्कसंगती या आधारेच हे विवरण प्रामुख्याने केलेले आहे. त्यासाठी अनेक गृहितके स्विकारली आहेत. ते अनेक बाबतीत बरोबरही नव्हते, किंवा समाधानकारक उत्तर देण्यासही बरेच युक्तीवाद असमर्थ होते. तरीदेखील त्यातील सूक्ष्म निरीक्षणे, प्रखर बुध्दीवाद, मिथ्या कथा उघड करण्याचे सामर्थ्य थक्क करते. माणसाने विवेकी, विचारी, सत्य मानणारे, डोळस बनावे या उदात्त हेतूने ती लिहीली होती. त्यातून मनुष्याला महत्त्वाकांक्षा, भय, चंगळवादी आसक्ती यातून मुक्त होता येर्इल आणि मनस्वास्थ्य व शांती लाभेल अशी त्यांची धारणा होती. पृथ्वीचा जन्म, निसर्गाचे चलनवलन, जिवाचा उगम व मानवी समाजाचा विकास या सर्व अंगांचा सहा खंडात उहापोह करुन तर्कशुध्द दृष्टी व सुसंगत मिमांसा उभी करून लोकांना अंधश्रध्देच्या जाळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न रोममध्ये इ.स. पूर्व पहिल्या शतकात पराभूत झाला तरी तो 15 व्या शतकात फलद्रूप झाला. ल्युक्रिशिअसच्या काळात तो विचार पूर्णतया दडपला गेल्याने त्यांची नावनिशाणीही कोठे आढळत नाही. त्यांची व्यक्तिगत माहितीही उपलब्ध नाही. केवळ त्याच्या ग्रंथातील संदर्भावरुन त्यांचा काळ, समाज, व त्यांच्या जीवनाबाबत काही तर्क लढवता येतात. त्यावरुनच ल्युक्रिशिअस रोमन साम्राज्यात इ.स. पूर्व 98 ते 55 या काळातला, एका उमराव कुटुंबातला, तत्कालिक अन्याय अत्याचारामुळे अस्वस्थ असलेला बुध्दिवादी होता असे दिसते. त्यांचे जीवन बरेचसे एकांडे असावे. दऱ्याखोऱ्यात भटकून निसर्गाचा आणि ग्रामीण जीवनाचा आनंद मनमुराद लुटत, खेडुतांसोबत जेवणखाण घेत साधे व सोज्वळ जीवन ते जगले असे दिसते.
पंधराव्या शतकातील युरोपातील वैचारिक पुर्नउथ्थापन व वैज्ञानिक विचारसणीच्या प्रसाराला चालना देण्यात ल्युक्रिशिअसच्या विचारांचा मोठा वाटा होता. त्यातून पुढे युरोपात वैचारिक क्रांती झाली व विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीला वेग आला.