जन्म: १४ डिसेंबर १५४६.
मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१.
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.
टायको ब्राह
Tycho Brahe
डॅनिश खगोलशास्त्रज्ञ
जन्म : 14 डिसेंबर, 1546
मृत्यू : 24 ऑक्टोबर, 1601
‘दूरदृष्टी’ असलेला खगोलशास्त्रज्ञ
अनंत आकाश आणि त्यातील ग्रहताऱ्यांनी मानवी मनाला नेहमीच भुरळ घातलेली आहे. आज मोठमोठे दूरदर्शक, रेडिओ दुर्बिणी व प्रत्यक्ष ग्रहगोलांजवळ अंतराळायाने पाठवून त्यांचा वेध माणूस घेत आहे. पण जेव्हा दुर्बिण (टेलिस्कोप) माहीत नव्हती, तेव्हासुद्धा अचंबित व्हावे असा ग्रहगोलांचा अभ्यास खगोलशास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यापैकीच एक टायको ब्राह.
डॅनिश सरदार घराण्यात जन्मलेले टायको ब्राह हे टायको या नावानेच ओळखले जातात. कायदा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर टायको यांनी राजकारणात जाण्याचे ठरवले होते. परंतु, 1560 मध्ये सूर्यग्रहण पाहिल्यानंतर त्यांना खगोलशास्त्रात रुची उत्पन्न झाली आणि त्यांनी गणित खगोलशास्त्राचा अभ्यास केला. तेव्हा दुर्बिणीचा शोध लागला नव्हता. आकाश निरीक्षण नुसत्या डोळ्यांनीच करावे लागे.
1563 साली गुरू आणि शनीचा अभ्यास करताना टायको यांच्या लक्षात आले की, त्या काळचे तारा मंडळाचे तक्ते अचूक नव्हते. म्हणून त्यांनी अचूक तक्ते बनवण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच आकाश निरीक्षणाची तत्कालीन विविध उपकरणे त्यांनी जमा केली. 1572 साली एका नवदीप्त ताऱ्याच्या अभ्यासामुळे ते खऱ्या अर्थाने नावारूपाला आले. 1572 मध्ये त्यांनी बावन्न पानी पुस्तक प्रसिद्ध केले. त्याचे नाव होते ‘नवताऱ्याविषयी काही’ (द नोवा स्टेला). त्यांनी अभ्यासलेल्या नवताऱ्याबद्दल त्यांनी दाखविले की, हा तारा हळूहळू दीप्तीमान होत होत शुक्रापेक्षाही तेजस्वी झाला आणि सुमारे दीड वर्षानंतर त्याचा प्रकाश मंदावून तो दिसेनासा झाला. या प्रकारचे तारे म्हणजे नव्याने उत्पन्न होणारे तारे नसून अस्तित्वात असलेल्या, नेहमी न दिसणाऱ्या ताऱ्यांचा स्फोट होऊन ते फुटतात तेव्हा त्यांचा प्रकाश वाढतो म्हणून ते दृष्टीला पडतात.
टायको यांच्या पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर स्फोट होऊन फुटणाऱ्या सर्व ताऱ्यांना नोव्हा असे नाव पडले. नोव्हा चंद्रापेक्षादेखील दूर अंतरावर असतात, हे सिद्ध झाले व तरुण टायको यांच्या नाव ख्यातनाम खगोलखास्त्रज्ञांमध्ये गणले जाऊ लागले. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आरिस्टॉटलने मांडले होते की, अंतरिक्ष अगदी परिपूर्ण आणि अपरिवर्तनीय असते. हे मत टायको यांच्या काळातदेखील प्रचलित होते. परंतु, फुटणाऱ्या नोव्हाच्या शोधामुळे न बदलणाऱ्या अंतरिक्ष कल्पनेला जबरदस्त धक्का बसला.
त्या काळी जर्मनी खगोलशास्त्रात प्रगत मानला जात होता म्हणून टायको डेन्मार्क सोडून जर्मनीला स्थलांतर करण्याच्या विचारात होते. हे समजताच डेन्मार्कचा राजा दुसरा फ्रेडरिक याने टायको यांना आणि खगोलशास्त्राला राजाश्रय दिला. त्यानंतर टायको यांनी व्हेन येथे एक सुसज्ज वेधशाळा उभारली. ही जगातील सर्वप्रथम उभारलेली त्या प्रकारची वेधशाळा ठरली. टायको यांची ख्याती जगभर पसरली. अनेक देशांतून खगोलशास्त्रज्ञ तेथे अभ्यासासाठी येऊ लागले.
1577 मध्ये एका धूमकेतूचे आकाशात आगमन झाले. टायको यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून काटेकोरपणे त्याचा अभ्यास केला. धूमकेतू म्हणजे येणाऱ्या प्रलयाची आणि सर्वनाशाची सूचना देणारा अपशकून असे त्या काळी समजले जात असे. खगोलांचे अभ्यासकसुद्धा यामुळे भयभीत होत असत. टायको यांच्या अभ्यासू निरीक्षणांमुळे हा भयगंड कमी होण्यास मदत झाली. या धूमकेतूचा भ्रमणमार्ग अभ्यासून त्यांनी दाखवून दिले की, त्याच्या भ्रमणाची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. वातावरणातील प्रकाशाच्या वक्रीभवनाचा ग्रह-ताऱ्यांच्या जागी निश्चित करताना होणारा परिणाम आणि त्याकाळी वापरात असलेल्या उपकरणातील दोष या त्रुटींचा विचार टायको करत असत. नुसत्या डोळ्यांनी त्यांच्याइतकी अचूक निरीक्षणे तेव्हाच्या दुसऱ्या कोणत्याच खगोलशास्त्रज्ञाने केली नव्हती. मंगळ आणि सूर्य यांच्या गतीची जवळजवळ अचूक नोंद टायको यांनी केलेली होती. तसेच त्यांनी ठरवलेला वर्षाचा कालावधी फक्त एका संकेदाने चुकला होता. अशा अचूक निरीक्षणांमुळे व गणितामुळे त्या काळच्या कॅलेंडरमध्ये सुधारणा करणे अनिवार्य ठरले. 1582 मध्ये पोप आठवा ग्रेगरीच्या प्रायोजनाखाली त्या वर्षाचे दहा दिवस कमी केले गेले. प्राचीन रोम साम्राज्याच्या कालमापन पद्धतीमुळे चूक साठत आल्याने एवढी मोठी चूक निर्माण झाली होती. तसेच पुढील काळात अशी प्रचंड चूक साचत जाऊ नये म्हणून प्रत्येक चारशे वर्षांच्या कालखंडात शंभरऐवजी सत्याण्णव लीप वर्षे धरण्याचे ठरले. 1700, 1800, 1900 साल चाराने भागले जात असले तरी लीप वर्ष मानायचे नाही असे ठरले. 1600 आणि 2000 सालांना चारशेने भाग जात असल्याने लीप वर्ष ठरवले गेले. हे सुधारित ग्रेगोर कॅलेंडर कॅथॉलिक पंथियांनी लागलीच मान्य केले. आज जगभर हेच कॅलेंडर प्रमाण मानले जाते.
1597 साली टायको यांनी जर्मनीचा सम्राट दुसरा रूडॉल्फ याचे निमंत्रण स्वीकरले व ते जर्मनीत असलेल्या प्रागमध्ये स्थायिक झाले. तेथे खगोलशास्त्रीय अभ्यास सुरू केल्यावर त्यांना एक तेजस्वी तारा गवसला आणि तो म्हणजे त्याचा तरुण सहकारी, त्याचे नाव होते योहान केल्पर. आपल्या निरीक्षणांची, अभ्यासाची सर्व माहिती टायको यांनी केप्लरला दिली आणि त्या आधारे ग्रहांच्या भ्रमण कक्षेचे तक्ते बनवण्याचे काम केप्लरने स्वत:च्या सखोल अभ्यासाची जोड देऊन अचूकपणे व उत्तमरीत्या पुरे केले.