Menu

विल्यम हार्वे

(William Harvey)

जन्म: ०१ एप्रिल १५७८.
मृत्यू: ०३ जून १६५७.
कार्यक्षेत्र: शरीरशास्त्र.

विल्यम हार्वे
William Harvey
इंग्लिश शरीरक्रियातज्ज्ञ
जन्म: 1 एप्रिल, 1578
मृत्यू: 3 जून, 1657

चिकित्सक संशोधक

माणसाच्या शरीरात रक्ताभिसरण कसे होते हे आता सातवीच्या विद्यार्थ्यांना माहीत असते. आज एवढ्या सोप्या वाटणाऱ्या क्रियेचा शोध लावण्यासाठी जगातील उत्तमोत्तम वैज्ञानिकांना शेकडो वर्षे कशी लागली व त्यात विल्यम हार्वे यांची नेमकी कामगिरी कोणती, हे समजून घेणे अतिशय उद्बोधक आहे.
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात गालेन (इ.स. 130 ते 199) या ग्रीक चिकित्सकाने शरीरक्रियेच्या विवरणाबरोबरच काही प्राण्यांचे शरीर विच्छेदन करून शरीररचनेविषयीचा ग्रंथ लिहिला होता. अर्थात, प्राण्यांच्या शरीररचनेबद्दल त्यांनी वर्णिलेल्या गोष्टी मानवी शरीररचना व क्रिया यांच्याबाबतीत जरी दर वेळेस लागू होत होत्या असे नव्हते, तरी युरोपमध्ये व्हेसेलिअस यां शरीररचनेविषयी आणि हार्वे यांचे शरीरक्रियेविषयी संशोधन प्रसिध्द होईपर्यंत गालेनचे लिखाण म्हणजे अखेरचा शब्द मानला जात होता. गालेनचा प्रभाव इतका जबरदस्त होता की विद्यार्थी जे शवविच्छेदन करीत ते गालेनचे म्हणणे कसे खरे आहे याची खात्री करून घेण्यासाठी!
प्राण्यांचे काळजीपूर्वक शवविच्छेदन करून त्यांच्या शरीराची रचना समजू शकली तरी मानवी शरीर क्रिया समजण्यासाठी हे अर्थातच पुरेसे नव्हते. आधुनिक उपकरणे तेव्हा उपलब्ध नसल्याने निरनिराळी निरीक्षणे, तार्किक अनुमाने यांच्याच आधारे मार्ग काढणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीवर निश्चित मर्यादा पडे. त्यामुळे काही वेळा आहे त्या माहितीच्या आधारे चाचपडावे लागे.
रक्ताभिसरणाबाबतचे सिध्दांत: गालेनच्या मतानुसार, नीलांमधील रक्त यकृतामधून जात असताना आवश्यक मूलद्रव्य मिसळली जाऊन ती नंतर शरीरभर पोचवली जात तर रोहिण्यांमधील रक्तात जीवनदायी विशिष्ट शक्ती मिसळून जात, ज्यायोगे चेतनादर्शक हालचाली करणे शक्य होत असे. गालेनच्या वर्णनानुसार नीलांमधील रक्त ह्रदयाच्या उजव्या कप्प्यात पोचल्यावर काही प्रमाणात ह्रदयातील मांसल पडद्यातून डावीकडे झिरपत असे व तिथे त्यात शक्तिवर्धक द्रव्ये मिसळली जात.
रक्त हे ह्रदयाच्या उजव्या भागातून डाव्या भागात जाण्यासाठी फुफ्फुसातूनच जावे लागते आणि ह्रदयाचे डावा आणि उजवा असे दोन भाग करणाऱ्या मांसल पडद्यातून झिरपण्याची शक्यता नाही, हा सिध्दांत अलकूफ या अरबी चिकित्सकाने 13 व्या शतकात ठामपणे मांडला. 1859 मध्ये कोलंबो याने फुफ्फुस व ह्रदय यांच्यातील रक्ताभिसरणाचे यथार्थ वर्णन केले. त्यानंतर सोसोलपिनो याने नीलांमधल्या झडपांचा शोध लावला, (नीलांमधून रक्त ह्रदयाकडेच जाते हे या झडपांच्या रचनेवरून स्पष्ट होते). गालेनच्या प्रभावाखाली असलेले या शास्त्राज्ञांचे मन स्वत:च्या शोधाचे महत्व जोखू शकले नाही विल्यम हार्वे यांचे मोठेपण हे की, त्यांनी ही सर्व निरीक्षणे, शोध यांच्या आधारे चक्राकार रक्ताभिसरणाचा सिध्दांत मांडून वैद्यकीय विज्ञान गालेनच्या सिध्दांताच्या चौकटीबाहेर आणले.
विज्ञानाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की, अभूतपूर्व प्रयोग व निरीक्षण केल्यामुळे महान शोध लागला असे नाही, तर आधी माहीत असलेली निरीक्षणे अधिक सुसंगत पध्दतीने गुंफणारा नवा वैज्ञानिक सिध्दांत मांडण्याची कल्पनाशक्ती व आत्मविश्वास असणे हे खरे या शास्त्रज्ञांचे वैशिष्ट्य होते. विल्यम हार्वे हे त्यापैकी एक महत्वाचे उदाहरण आहे. रक्ताभिसरण हे चक्राकार पध्दतीने चालते व पंपासारखे काम करणारे ह्रदय हे त्याचे केंद्रस्थान आहे या कल्पनेभोवती गुंतलेला सिध्दांत हार्वे यांनी मांडला ही त्यांची खरी कामगिरी होय. खगोलशास्त्रातील कोपर्निकस, न्यूटन, रसायनशास्त्रात लाव्हाझिये यांनी ज्या प्रकारची क्रांतिकारक कलाटणी दिली तसेच काम हार्वे यांनी शरीरक्रिया शास्त्रासंबंधी केले.
हार्वे यांनी केलेल्या प्रयोगांचेही स्वत:चे असे एक महत्व होते, खास घाटणी होती. त्यांनी शरीरशास्त्राचा अभ्यास ‘पुस्तकातून नव्हे तर शवविच्छेदनातून’ केला. ही प्रत्यक्ष केलेली निरीक्षणे व रूग्णांमध्ये होणाऱ्या बदलांची निरीक्षणे यांची त्यांनी सांगड घातली. निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या विच्छेदनातून त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला, छातीच्या फासळ्या तोडून अनुमानांना त्यांनी पुष्टी दिली. हृदयाच्या झडपांची रचना व हृदयाची हालचाल याच्या निरिक्षणांतून हृदयातील रक्तप्रवाहाची दिशा निश्चित केली.
चक्रीय रक्ताभिसरणाच्या सिध्दांतातून शरीरक्रिया शास्त्राला एक नवी दिशा मिळाली. चक्रीय फिरणारे रक्त कोठकोठे जाते, कोठकोठे त्याचे काय काय कार्य असते, इत्यादी प्रश्न उभे राहिले. श्वसनक्रिया, पचनक्रिया इत्यादीबाबत नव्या दृष्टीने पाहणे शक्य झाले. हार्वे यांचा शोध, त्यांची पध्दती व त्यांचे परिणाम या सर्व अर्थाने हार्वे यांचे काम क्रांतिकारक गणले पाहिजे.