Menu

डॉ. झफऱउल्ला चौधरी

(Zafrullah Chowdhury)

जन्म: ०१ जून २०१८.
कार्यक्षेत्र: वैद्यकशास्त्र.

डॉ. झफऱउल्ला चौधरी व
त्यांचे गोणोशास्थ केंद्र
Zafrullah Chowdhury
आरोग्य-चळवळीचा प्रणेता, बांगला देश
जन्म: जानेवारी 1941

आरोग्य-शिक्षणातील क्रांतिकारक

एखादा डॉक्टर रूढ अर्थाने राजकारणात न पडता एखाद्या देशाच्या आरोग्यविषयक धोरणात लोकभिमुख बदल घडवून आणू शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण बांगला देशाचे जगप्रसिद्ध डॉक्टर डॉ. झफरउल्ला चौधरी यांनी हे करून दाखविले. त्यांच्या प्रभावामुळे व दबावामुळे बांगलादेशाने आपले औषधविषयक धोरण 1982 मध्ये बदलून सुमारे 1,700 अशास्त्रीय घातक औषधांवर बंदी घातली. एका फटक्यात एवढ्या अशास्त्रीय औषधांवर बंदी घालण्याचे हे जगातले एकमेव उदाहरण. औषधांच्या अशास्त्रीय मिश्रणांवर बंगलादेशातील जनतेचे कोट्यावधी रूपये दरवर्षी वाया जायचे. ते या धोरणामुळे थांबले. नवे औषधविषयक धोरण ठरवण्यासाठी बांगला देश सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे डॉ. झफरउल्ला चौधरी हे सभासद होते. या समितीच्या शिफारशींना दिशा देण्यात व त्यांची यथार्थता सरकारला पटवून देण्यात डॉ. चौधरी यांचा मुख्य वाटा होता.
बांगला देशच्या मुक्तिसंग्रामापासून दहा वर्षे आरोग्याच्या क्षेत्रात सतत धडाडीने नवे प्रयोग यशस्वीपणे करून दाखवल्यामुळे डॉ. चौधरी यांचा एक प्रकारचा दरारा होता. प्रत्यक्ष मुक्तिलढ्यात सर्जन म्हणून भाग घेतलेला उच्चशिक्षित, अत्यंत हुशार, प्रामाणिक, कल्पक समाज कार्यकर्ता म्हणून आख्खा बांगलादेश झफरउल्ला यांना ओळखत होता. या आपल्या नावाचा उपयोग करून एक लोकाभिमुख धोरण डॉ. झफरउल्ला चौधरी यांनी बांगलादेश सरकारला मान्य करायला लावले. बांगला देशचे त्यावेळचे अध्यक्ष जनरल इर्शाद यांना जुलाबासाठी डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या होत्या. या गोळ्यांमुळे आंधळेपणा येऊ शकतो हे डॉ. चौधरी यांच्याकडून कळल्यावर जनरल इर्शाद यांचा सरकारी तज्ज्ञांवरचा विश्वास उडाला. सर्व प्रकारच्या घातक व अशास्त्रीय फॉर्म्युल्यांवर बंदी आणावी, ही झफरउल्ला समितीची शिफारस त्यांनी मान्य करण्यात या घटनेचाही वाटा होता! बांगला देशच्या या नव्या धोरणानुसार परदेशी कंपन्यांवरही खूप बंधने आली. जी औषधे तयार करायचे तंत्रज्ञान बांगलादेशी कंपन्यांकडे आहे, त्या औषधांचे उत्पादन परकीय कंपन्यांनी करू नये, असे बंधन या धोरणानुसार आले. या धोरणाविरूद्ध परकीय कंपन्यांनी खूप आरडाओरडा केला. अमेरिकन वकिलातीमार्फत सरकारवर खूप दबाव आणला. पण आता एवढे लोकप्रिय झालेले, अकारण महागड्या व अशास्त्रीय औषधांवर खर्च होणारे पैसे वाचवणारे नवीन धोरण सरकारला मागे घेता येणे शक्य नव्हते! जगभरच्या आरोग्य चळवळींनी या धोरणाला पाठिंबा दिल्यामुळेही ते तगून राहायला मदत झाली. झफरउल्ला चौधरी सांगतात की, या नव्या औषधविषयक धोरणासाठी त्यांनी भारतातील हाथी समिती पासून स्फूर्ती घेतली! (भारतात मात्र हाथी समितीच्या शिफारशी धूळ खात पडल्या आहेत!)
1982 मध्ये बांगला देशाच्या नवीन औषधाविषयक धोरणामुळे डॉ. चौधरींचे नाव जगप्रसिद्ध झाले. पण त्या आधी दहा वर्षे त्यांनी बांगला देशामध्ये आरोग्याच्या क्षेत्रात जे अभूतपूर्व प्रयोग केले त्यामुळे ते स्वत:च्या देशात चांगलेच वादग्रस्त ठरले होते. बांगला देशाच्या मुक्तियुध्दाच्या वेळी इंग्लंडमध्ये शल्यशाखेतील पदव्युत्तर शिक्षण सोडून ते सर्जन म्हणून मुक्तिवाहिनीत दाखल झाले. त्यांच्या बांगला देश हॉस्पिटलने प्रत्यक्ष रणभूमीवर शस्त्रक्रिया करून मुक्तिसंघर्षाला डॉ. कासिम चौधरी यांच्या सोबतीने ढाक्याजवळ सावर या गावी ‘गोणोशास्थ’ केंद्र (जनता आरोग्य केंद्र) 1972 मध्ये सुरू केले. या केंद्रात स्थानिक मुस्लिम स्त्रियांना आरोग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात आरोग्यसेवा व आरोग्य-शिक्षण पोचविण्याचे काम सुरू झाले.
मागास मुस्लिम समाजात बुरखा न घालता चक्क सायकलवर खेडोपाडी हिंडणाऱ्या या तरूण मुस्लिम आरोग्यसेविकांमार्फत झफरउल्ला यांनी एक प्रकारचे क्रांतिकारक कार्य सुरू केले. जेमतेम शालेय शिक्षण झालेल्या या स्त्री-कार्यकर्त्या काही वर्षात इतक्या तरबेज झाल्या की, त्यांच्यापैकी काहीजणी स्त्री-नसबंदी शस्त्रक्रिया करायला शिकल्या! प्रस्थापितांकडून गोणोशास्थ केंद्राला (जी.के.) खूप विरोध झाला. सहकारी पतपुरवठा संस्थेचे काम करणारा त्यांचा एक तळमळीचा कार्यकर्ता निझाम याचा स्थानिक जमिनदार व डॉक्टर यांनी संगमताने 1976 मध्ये खून केला. त्यांच्या केंद्रावरही हल्ले झाले. पण गोणोशास्थ केंद्र डगमगले नाही. स्त्रियांना प्रोत्साहन, समानतेचे खेळीमेळीचे वातावरण, जनतेचा पाठिंबा, झफरउल्ला यांचे धडाडीचे स्फूर्तिदायी नेतृत्व (संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यासाठी एकच समान स्वयंपाक केला जातो, झफरउल्लाही तिथेच जेवतात) यामुळे गोणोशास्थ केंद्राचे नाव, लौकिक व पसारा वाढत चालला. स्त्रियांच्या औद्योगिक प्रशिक्षणासाठी नारी केंद्र, पादत्राणांचा सहकारी कारखाना (गोणो पादुका), अभिनव पध्दतीची ग्रामीण, गरीब मुलांसाठी जीवन शिक्षण देणारी शाळा (गोणो-पाठशाला), सहकारी सुधारित शेती-मच्छिमारीचे प्रकल्प इ. उपक्रमातून ग्रामीण गरिबांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रायोगिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले. हे सर्व प्रयोग बांगला देशामध्ये तेव्हा पूर्णपणे नवीन होते. विशेषत: त्यातील स्त्रियांचा सहभाग. बांगला देशातील पहिली स्त्री बसचालिका गोणोशास्थ केंद्राची होती! आरोग्य म्हणजे डॉक्टर, हॉस्पिटल, औषध, गोळ्या हे समीकरण गोणोशास्थ केंद्राने मोडून काढले.
1980 मध्ये ‘गोणोशास्थ फॉरम्यॅस्युटिकल्स’ हा औषधांचा कारखाना काढून त्यांनी एक मोठी धडाडीची उडी मारली. त्यावेळी बांगला देशमध्ये आठ बहुराष्ट्रीय कंपन्यांचा 80 टक्के औषध बाजारपेठेवर ताबा होता. मक्तेदारीच्या जोरावर 80 कोटी टका (बांगलादेशी रूपया) किमतीची औषधे दर वर्षी या कंपन्या डॉक्टरांच्या संगमताने जनतेच्या गळ्यात मारत. त्यापैकी जवळजवळ निम्मी औषधे अशास्त्रीय वा घातक होती. सामाजिक संस्थांकडून कर्ज वा मदत घेऊन जी.के.ने आपला औषधाचा कारखाना उघडला. त्यात उत्तम दर्जाची, मूळ नावानेच वापरली जाणारी, आवश्यक औषधे स्वस्तात तयार होऊ लागली. ‘हे शक्य आहे’ हे सिद्ध केल्यावर ‘अशास्त्रीय मिश्रणांवर बंदी व परकीय कंपन्यांवर बंधने’ या मागणीचा जोर चढला. त्याची परिणती 1982 मध्ये नवीन औषधविषयक धोरण येण्यात झाली.
या धोरणाच्या विरोधात परकीय कंपन्यांनी बांगला देश सोडून जायची धमकी दिली तेव्हा ती पोकळ ठरली. कारण परकीय कंपन्या गेल्या तरी आवश्यक औषधांचा तुटवडा होण्याची भीती आता नव्हती. कारण जी. के. हा औषध कारखाना आता सोबतीला होता! उत्तम दर्जाची आवश्यक औषधे 30 ते 40 टक्के कमी किमतीला पुरवणारा हा कारखाना व त्याचे प्रणेते डॉ. झफरउल्ला चौधरी व त्यांचे जी. के. परकीय कंपन्यांच्या हस्तकांच्या डोळ्यांत सलत नसल्यासच नवल. जी.के. वर, झफरफल्ला यांच्यावर, नवीन औषध धोरणावर आरोप, जी.के.च्या कार्यालयांवर हिंसक हल्ला इत्यादीला तोंड देत आज जी.के. अभिमानाने उभे आहे. त्यातील बहुसंख्य स्त्री कार्यकर्त्या त्यांच्या प्रमुख रक्षणकर्त्या ठरल्या. आहेत. जनतेच्या आरोग्यगरजांना सामोरे जाण्याला योग्य असे प्रशिक्षण देणारे वैद्यकीय महाविद्यालय जी.के.ने बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नांनी व बरेच अडथळे दूर करून सुरू केले आहे.